Tuesday, January 9, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “CTRD 2k17” या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन!!

फोटो:- उद्घाटनप्रसंगी डावीकडून व्यासपीठावर प्रमुख अतिथी व आयएसटीई न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, सन्माननीय अतिथी व कार्यकारी परिषद आयएसटीई न्यू दिल्लीचे प्रतिनिधी प्रा.आर.के. सावंत, संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने, सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे, आयोजक प्रा. अजित तातुगडे, सहआयोजक प्रा. लक्ष्मण नाईक
   देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “चेंजिंग टेक्नॉलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेंट CTRD 2k17 या विषयावर सलग दुसऱ्या शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग अधोरेखित करणाऱ्या या परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील ५० शोधनिबंध मांडण्यात आले.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख अतिथी व आयएसटीई , न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई,सन्माननीय अतिथी व कार्यकारी परिषद आयएसटीई ,न्यू दिल्लीचे प्रतिनिधी प्रा.आर.के. सावंत,सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे, संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, समन्वयक प्रा. अजित तातुगडे,सह समन्वयक प्रा. लक्ष्मण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

  आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दरी कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले.व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने भविष्यामध्ये कोकणातील सर्वोत्तम महाविद्यालय बनविण्याचा मानस प्राचार्य भागवत यांनी व्यक्त केला.नॅक मानांकनात नुकत्याच मिळालेल्या “बी प्लस” ग्रेडचा व एआयसिटीई च्या सुवर्ण श्रेणीचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. त्यानंतर प्रा. नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
   
  प्रमुख अतिथी व आयएसटीई,न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई यांनी अत्यंत प्रभावी शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने यांचे संस्थेप्रती असलेले समर्पण व प्रेरणादायी प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.संस्थेप्रती व खासकरून कोकणाविषयी असलेला आपला स्नेहभाव त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस झपाट्याने बदलत असल्याने उद्योगविश्वही बदलत आहे.त्यासाठी आपणालाही बदलावे लागेल व त्यादृष्टीने इंजिनिअर्स घडवावे लागतील.यासाठी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनीही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना घडविण्याची व त्यांच्या क्षमता विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची एखाद्या विषयाप्रती उत्सुकता वाढली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.बदलत्या तंत्रज्ञाचे आव्हान पेलण्यासाठी नजर, सोच व दिशा बदलो असा मंत्र त्यांनी दिला.

  संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने यांनी उपस्थित मान्यवरांचे व सह्भागी स्पर्धकांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य व आत्मविश्वासाची असलेली कमतरता भरून काढण्याची आवश्यकता असल्याने त्यादृष्टीनेही संस्था प्रयत्न करत आहे.कोकणातील विद्यार्थी हुशार असून आपल्या क्षमता वाढवण्यावर त्याने भर द्यावा असे त्यांनी सांगितले.यानंतर सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे यांनी “लेसन्स लर्नड फ्रॉम लीन सिक्स सिग्मा प्रोजेक्ट्स” याविषयावर उपस्थितांना संबोधित केले.आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असून त्याना पूरक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

  त्यानंतर विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध दोन सत्रांमध्ये सादर केले.याकरिता तज्ञ परीक्षक म्हणून सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे,फिनोलेक्स महाविद्यालयाचे डॉ.एस.व्ही.चौगुले,डॉ.व्ही.ए.भराडी उपस्थित होते. परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध IJSART या यु.जी.सी. मान्यताप्राप्त जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  निरोपसमारंभामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली तसेच प्रत्येक विभागाच्या प्रथम विजेत्यास बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सत्र अध्यक्ष डॉ.संतोष राणे, डॉ.एस.व्ही.चौगुले,प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.निवडक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही परिषदेसंदर्भात आपली मनोगते व्यक्त करून परिषदेच्या सुयोग्य नियोजनाबद्दल आभार व्यक्त केले. समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी परिषदेचा आढावा घेतला व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. संस्थेचे सहसचिव श्री.दिलीप जाधव यांनीही आपले विचार मांडले.सूत्रसंचालन प्रा.एस.डी.देठे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रमोद वाईकर व प्रा.पी.पी.क्षिरसागर यांनी केले.

 
      

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सलग दुस-यांदा सुवर्ण श्रेणीमध्ये समावेश ‼

आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सलग दुस-यांदा  ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. माने अभियांत्रिकी  महाविद्यालयाला नॅक अर्थात राष्ट्रीय मुल्यांकन प्रमाणन परिषदेने केलेल्या परीक्षणात पाच वर्षांसाठी   बी प्लस   श्रेणी नुकतीच प्रदान करण्यात आली.  ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई),नवी दिल्ली व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांची औद्योगिक जगताबरोबर असणारी संलग्नता याविषयी सर्व्हे (आढावा) घेण्यात आला.या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी जून २०१७ ते ऑगस्ट २०१७ या दरम्यान एआयसीटीईच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. २०१७ वर्षासाठी संपूर्ण भारतातून शॉर्ट सर्व्हे घेऊन त्यामधून ४७९० अभियांत्रिकी संस्था फुल सर्व्हेसाठी निवडण्यात आल्या व त्यामधूनही विशेष निवड प्रकियेतून ७८६ संस्थाच यशस्वी ठरल्या.
  या सर्व्हेमध्ये ६ वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाचे औद्योगिक विश्वाशी असणारे संबंध तपासण्यात आले.यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा महाविद्यालयातील विविध समित्यांमधील सहभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्प,मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक सहल यासारख्या प्रकारामध्ये सहभाग, विद्यार्थ्यांचे नोकरी लागण्याचे अथवा स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचे प्रमाण, महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा अशा अनेक परिमाणांचा समावेश होता.सहभागी झालेल्या ७८६ संस्थांना प्लॅटीनम,गोल्ड व सिल्वर या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले. सुवर्ण श्रेणीं मिळवून माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने वालचंद कॉलेज सांगली,गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कराड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी,लोणेरे, के.जे.सोमैया महाविद्यालय यांसारख्या प्रथितयश महाविद्यालयांशी बरोबरी केली आहे.
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोकणातील एकमेव महाविद्यालय सुवर्ण(गोल्ड) श्रेणींमध्ये मानांकन मिळवण्यात यशस्वी झाले आहे. राजेंद्र माने महाविद्यालयाने औद्योगिक जगताबरोबर परस्पर संबंध वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. विविध नामांकित उद्योगसमूहांमधील तज्ञ व्यक्तींना प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून त्यात मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.तृतीय वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर किमान दोन आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय महाविद्यालयाने आमलात आणला आहे.शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांचे प्रकल्प हे जास्तीतजास्त औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्याना औद्योगिक क्षेत्राची तोंडओळख व्हावी यासाठी विविध नामांकित
उद्योगसमूहांमध्ये शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.
  या सर्वांमुळे गतवर्षाप्रमाणे याहीवर्षी या सर्व्हेमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाने ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरअॅक्शन सेलचे प्रमुख प्रा. राहुल दंडगे व सदस्य प्रा.विकास मोरे, प्रा.इसाक शिकलगार, प्रा. सुमित सुर्वे व प्रा. स्नेहल मांगले यांनी परिश्रम घेतले. यासाठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले. संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने व प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच या सर्व्हेत यशस्वीरीत्या सहभागी होता आले अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.

माने अभियांत्रिकीस नॅक ची “ बी प्लस ” श्रेणी प्रदान !
देवरुख (आंबव) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी  महाविद्यालयाला नॅक अर्थात राष्ट्रीय मुल्यांकन प्रमाणन परिषदेने केलेल्या परीक्षणात पाच वर्षांसाठीबी प्लस  श्रेणी प्रदान केली आहे. शैक्षणिक संस्थांचे, तिथल्या शिक्षण पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने बंगळूरू येथे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा शैक्षणिक दर्जा तपासून त्यांना अधिस्वीकृती देण्यासाठी नॅकअर्थात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि    प्रमाणन परिषदेची स्थापना केली आहे.

  याच  परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने दिनांक 3 4 नोव्हेंबरला महाविद्यालयास भेट दिली. या समितीमध्ये  गुलबर्गा विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. बी. जी. मुलीमणी, हिमाचल प्रदेश विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अरविंद कालिया तसेच कोलकाता येथील जे.आय.एस.कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. उर्मीब्रता बन्ड्योपाध्याय यांचा सहभाग होता. त्यांनी सलग दोन  दिवस  कॉलेजमधील प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, व्यवस्थापन, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रंथालय, कॅण्टिन, क्रीडा विभाग, एनएसएस,डब्ल्यू.डी.सी.,टी.पी.सी.,ई.डी.सेल इत्यादी कमिटी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्व घटकांशी संवाद साधून विविध बाबींचे परीक्षण केले. समितीने कॉलेजमधील पायाभूत सुविधांचे आणि व्यवस्थापनाची कार्यप्रणाली कर्मचाऱ्यांशी असलेल्या समन्वयाचे विशेष कौतुक केले. 
 
  महाविद्यालयात प्रा.डी.एम.सातपूते यांनी नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले.सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळेच हे यश मिळाल्याचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी नमूद केले.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री रविंद्रजी माने यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले. या महाविद्यालयाला बी प्लस श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल देवरुखवासियांमधूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.