Monday, September 18, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘करिअर क्लब’ चे उद्घाटन !


 उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर


‘करिअर क्लब’ प्रसंगी प्रथितयश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पारि इंडस्ट्री चे डायरेक्टर व प्रमुख पाहुणे श्री.गोविंद ओझा मार्गदर्शन करताना

  सध्या जगभर भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी! कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध असूनही रोजगारक्षम अभियंत्यांचा तुटवडा आणि प्रचंड प्रमाणात निर्माण झालेले अकार्यक्षम मनुष्यबळ यांच्यामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागातर्फे करण्यात आला.
  विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करीअरसंदर्भात मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात  करिअर क्लब  ची स्थापना करण्यात आली.त्याचे उद्घाटन प्रथितयश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘प्रिसिजन ऑटोमेशन अॅंड रोबोटिक्स लिमिटेडचे’ डायरेक्टर श्री.गोविंद ओझा यांचे हस्ते झाले.त्याप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा.भोपळे, विभागप्रमुखप्रा.राहुल राजोपाध्ये,ऑटोट्रेंड्स चे इनचार्ज प्रा. स्वप्नील रावूळ उपस्थित होते.
  याप्रसंगी प्रास्ताविक करताना ‘करिअर क्लब  स्थापन करण्यामागची संकल्पना प्रा.राजोपाध्ये यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून करिअरबाबतचे उपक्रम राबवले तर ते जास्त यशस्वी होतील असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात आस्था निर्माण करणे, करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे,प्रत्येक विद्यार्थ्याचा डाटाबेस तयार करून तो नोकरी मार्गदर्शन केंद्रांना उपलब्ध करून देणे, महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन करू इच्छिणा-या माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क प्रस्थापित करणे आणि नामवंत तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे हि करिअर क्लबची उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी सांगितले कि सध्याच्या युगामध्ये अशा पद्धतीच्या क्लबमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संदर्भात आश्वासकता निर्माण होईल. प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक श्री.गोविंद ओझा यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून करिअर क्लब हि एक अत्यंत चांगली आणि आवश्यक अशी संकल्पना असल्याचे सांगितले.अशा पद्धतीचे क्लब युरोप,अमेरीकामधील युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असतात.
  आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्र माने म्हणाले कि मी इंजिनीअरींग केले नाही पण मला इंजिनीअरींग समजते. विद्यार्थ्यांच्या मनात करिअर संदर्भात आवड निर्माण करण्याचे काम या करिअर क्लब तर्फे होईल यात शंका नाही.त्यानंतर महाविद्यालयातील तसेचतंत्रनिकेतनमधील ५०० विद्यार्थ्यांसाठी श्री.गोविंद ओझा यांनी दिवसभर दोन सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्नील रावूळ यांनी समन्वय केला.विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदेश आखाडे,अक्षय पेंढारी,प्रवीण आंबेकर, अक्षय मडगे,हर्षल मोचेमाडकर यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment