Tuesday, April 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन विभागातर्फे “ परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न ‼!

फोटो:- डावीकडून प्राचार्य डॉ. महेश भागवत ,मार्गदर्शक श्री. सुनीत देव,वॉटर रेसोर्सेस इंजिनीअर,एचडीआर,यूएसए समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विद्यार्थी
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मार्गदर्शक श्री. सुनीत देव
 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये करिअर मार्गदर्शन विभागातर्फे परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाच्या  उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मार्गदर्शक श्री. सुनीत देव, वॉटर रेसोर्सेस इंजिनीअर,एचडीआर,यूएसए यांची ओळख करून दिली. मार्गदर्शक श्री. सुनीत देव हे गेली १५ वर्षे एचडीआर या फर्ममध्ये कार्यरत असून हि फर्म अमेरिकेतील पहिल्या १० नामांकित फर्मपैकी एक आहे. श्री. सुनीत देव हे देवरुख मधील आठल्ये सप्रे कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक डॉ.रमेश देव तसेच देवरुख हायस्कूलच्या माजी शिक्षिका सौ.वृषाली देव यांचे सुपुत्र आहेत.हे व्याख्यान महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन विभागातर्फे अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

   विद्यार्थ्यांना संबोधित करताना मार्गदर्शक श्री. सुनीत देव यांनी परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधींविषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की,परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रथमत: परदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांचा आढावा इंटरनेट अथवा आपल्या ओळखीच्या माध्यमातून करून घ्यावा. GRE TOEFL यासारख्या परदेशी पदव्युत्तर शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी त्यांनी विवेचन केले.त्याचबरोबर त्यांनी परदेशामध्ये शिक्षण घेताना संशोधनपर निधी कसा उपलब्ध करून घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.या निधीमुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळते असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

  याप्रसंगी बोलताना समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे  यांनी विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर शिक्षणाकडे कल असावा व त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोप प्रसंगी समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री. सुनीत देव तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.


No comments:

Post a Comment