Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१७” चे शानदार उदघाटन !!



प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१७या    वार्षिक कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उदघाटन प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री.दिलीप जाधव, संचालिका जान्हवी माने,प्रमुख पाहुणे व आठल्ये सप्रे कॉलेजचे क्रीडा शिक्षक व हॉकी ट्रेनर श्री.सागर पवार, प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, आरोहनचे क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ गुरव  व्यासपीठावर उपस्थित होते.
  महोत्सवाची सुरुवात इशस्तवनाच्या  मंगल सुरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर  मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आरोहनची क्रीडाज्योत श्री कालीश्री मंदिरात प्रज्वलित करून मिरवणुकीने क्रीडांगणामध्ये आणण्यात आली.  या क्रीडाज्योतीची मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या हस्ते क्रीडांगणामध्ये स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विभागवार सुरेख व शिस्तबद्ध संचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थी क्रीडाप्रमुखाने सहभागी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती व निष्ठेची शपथ दिली.
  प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळामध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व विषद केले व पुढील दहा दिवस चालणा-या विविध कला व क्रीडा प्रकारांमधील स्पर्धांमध्ये त्याची जोपासना करावी असे सांगितले. तसेच याप्रसंगी प्राचार्यांनी विविध अॅवार्ड्सची घोषणा केली.यामध्ये चेअरमन’स्  अॅवॉर्ड् सर्वोत्तम विद्यार्थी व सर्वोत्तम खेळाडूसाठी ,कै.श्री.राजेंद्र माने अॅवॉर्ड् प्रथम वर्ष अभियांत्रिकीमधील प्रथम क्रमांकासाठी, कै.श्रीमती. इंदुमती माने अॅवॉर्ड् प्रत्येक विभागाच्या अंतिम वर्षाच्या प्रथम क्रमांकासाठी जाहीर करण्यात आले.
  प्रमुख पाहुणे श्री.सागर पवार हे सध्या आठल्ये सप्रे कॉलेजमध्ये  क्रीडा शिक्षक व हॉकी ट्रेनर आहेत.भारतीय हॉकी संघाचे ते गोलकीपरदेखील होते.विविध हॉकी स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्वदेखील केले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचे महत्त्व विशद केले तसेच आपल्या लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीतही आपण कसे घडलो याचे विवेचन केले.आपल्या कुटुंबाच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले असे ते म्हणाले. श्री.सागर पवार यांना नोकरीच्या चांगल्या संधी आलेल्या असूनही त्यांनी त्या नाकारून व गावाकडील नोकरी स्वीकारून तेथील मुलांना हॉकी या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले.

  या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संचलन प्रकारचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये कॉम्प्युटर व आयटी विभागाने प्रथम, अणुविद्युत व दूरसंचार  विभागाने द्वितीय व ऑटोमोबाईल विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.या क्रीडाप्रकाराचे परीक्षण प्रा.काळे यांनी केले.२६ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या महोत्सवामध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल,फुटबॉल,टेनिस यांसारख्या मैदानी खेळांबरोबरच कॅरम,पेंटिंग,कविता लेखन,व्यंगचित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रसाद मोरे व श्रिया पालकर यांनी केले. क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment