Wednesday, January 27, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “पदवी प्रमाणपत्र वितरण” सोहळा संपन्न !!

   


पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा.श्री.रविंद्र माने, सौ.नेहा माने,प्रमुख पाहुणे डॉ.ज्ञानदेव पाणिंद्रे,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि परीक्षाप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी
आंबव,देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संचलित,मुंबई विद्यापीठ संलग्न राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.गतवर्षीपासून मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात येते.या पदवीप्रदान सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा.श्री.रविंद्र माने उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्षा सौ.नेहा माने,प्रमुख पाहुणे डॉ.ज्ञानदेव पाणिंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि परीक्षाप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी उपस्थित होते.दिपप्रज्वलनानंतर ईशस्तवन व सरस्वतीवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
   प्रा.विश्वनाथ जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणारी ही १४ वी बॅच असून आत्तापर्यंत ३५०० विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. याही वर्षी सर्वच विभागामध्ये महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. महाविद्यालयाच्या विविध शाखांचे निकाल अनुक्रमे  संगणक विभाग ९८.६६%,माहिती तंत्रज्ञान विभाग १००%, अणुविद्युत व दूरसंचार विभाग ८८.४६%, यांत्रिकी विभाग ७५.००% ऑटोमोबाईल विभाग ६०% असे आहेत.याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात रचना सप्रे,सायली चांदेकर,चंदन भगत व स्वानंद जोशी या स्नातकांनी महाविद्यालयाप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या.
    आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी स्नातकांना पदवी हा आयुष्याचा एक भाग असून ही नवीन आयुष्याची सुरुवात असल्याची जाणीव करून दिली.याप्रसंगी पॅनोमटेक  टेकनो.प्रा.लि.,पुणे चे डायरेक्टर डॉ.ज्ञानदेव पाणिंद्रे यांनी उपस्थित स्नातकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.पाणिंद्रे हे याच महाविद्यालयाचे २००७ चे माजी विद्यार्थी आहेत.त्यानंतर त्यांनी स्वत:ची आयटी क्षेत्रातील सेवा पुरवणारी प्रा.लि.कंपनी २०१० साली स्थापन केली व आजतागायत कंपनी अतिशय उत्कृष्ट रित्या कार्यरत आहे.तसेच त्यांच्या कंपनीला जागतिक स्तरावर अनेकदा व्यावसायिक श्रेष्ठता  पुरस्कार मिळाले आहेत.महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांकडून शिकवल्या जाणारया संकल्पना उर्वरित आयुष्यामध्ये पावलोपावली उपयोगी पडतात तसेच स्नातकांनी मिळालेल्या पदवीचा उपयोग स्वत:चा,समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्र माने यांनी उपस्थित स्नातकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. श्री. माने यांनी सांगितले की सामाजिक उत्थानाला चालना देण्यासाठी हे महाविद्यालय काम करते.जीवनात यशस्वी होण्यासाठी दिल आणि दिमाग या दोहोंची आवश्यकता असते.याप्रसंगी ब्रेन ड्रेन बद्दल चिंता व्यक्त करून श्री. माने यांनी ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा वापर हा आपल्या देशाच्या विकासासाठी व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. इसाक शिकलगार यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. सादळे यांनी सूत्रसंचालन केले.
  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभाग तसेच प्रा.गुरुप्रसाद बुर्शे,प्रा.वैभव डोंगरे,प्रा.स्नेहल मांगले,प्रा.अमोल यादव यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment