Friday, December 4, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पुल कॅम्पसचे’ आयोजन !!



   


                                      अक्षय कळंबटे(BE COMP)   कु.करिष्मा पेडणेकर(BE IT)


आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये
पर्सिस्टंट सिस्टिम,पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या वतीने ‘पुल कॅम्पसचे’  आयोजन करण्यात आले.
याअंतर्गत तांत्रिक क्षमता चाचणी, तांत्रिक मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीकरता वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश होता.
   कोकण विभागातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामधून  सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून २८ विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली.त्यापैकी ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागातून अक्षय कळंबटे (BE COMP),कु.करिष्मा पेडणेकर (BE IT) यांनी सुयश संपादिले.याप्रसंगी कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन कार्यकारी अधिकारी श्री.नितांत जोशी यांनी तृतीय वर्ष संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.याप्रसंगी श्री. जोशी यांनी कंपनीची माहिती,ग्राहक तसेच कंपनीमध्ये उपलब्ध अत्याधुनिक  तंत्रज्ञानाची माहिती दिली. संवाद साधताना श्री. जोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वत:तील ज्ञानाला व्यक्त करण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयास हवी.
   महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा त्यांनी गौरव करुन विद्यार्थ्यांना 
कॅम्पस प्लेसमेंटचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर “पुल कॅम्पसचा” कोकण विभागातील कणकवली, रत्नागिरी,खेड,वेळणेश्वर,चिपळूण इ. शहरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना फायदा झाला.नुकतीच या महाविद्यालयातील इतर चार विद्यार्थ्यांची ‘एल अॅंण्ड टी इन्फोटेक’ या आय टी क्षेत्रातील कंपनीने नोकरीसाठी निवड केली आहे.
  सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. अतुल यादव यांनी प्रा.पराग जोशी व प्रा. ओंकार डिके यांच्या सहकार्याने सिंहाचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.